Wednesday, 18 March 2009

Migration and Recession : Part 1

Migration or even recession is not a new concept to world. We Bharatiya have seen since long so called brain drain. People argued about it whether it is really brain drain or not. After dotcom and Y2K bubble busted thousands or may be lacs came back, then every started talking about reverse brain drain. But is there anything called reverse brain drain? I don't think so.

Recent recession affected area like USA, Europe and worstly affected UK are seeing people fleeing back to their home countries. Recent news might have capture eyes of people if not I am giving here few. Australia is chaning their migration policy and reducing migrants by 30%. Malysia is going to reduce foreign workers to 1.8 million from 2 million (Here actually figure seems very less but it is 10% of current foreign migrants.) and who have already reduced 60,000 migrants in last year. UK is changing work permit, skilled migrants and residence permit rules. So what will happen to those people who are not able to keep their jobs in such outsider countries? They have to return back to their own country, in most cases.

Recent news which is flashing here in UK is about Polish people. There are around 1.2 million Poles here in UK. Already many have started migrating back to Poland. It is warned by economic adviser in their country that about 400,000 Poles are likely to go back to their home country. What these people were working here? From how long? Why are they going back? Will you call this reverse brain drain?

I want to write more about this, in the next part.

Monday, 16 March 2009

Something to share...

I have thought of such kind of situation, I have seen few of my friends going thru similar situations and reacting totally different than what I could have done. This is one very good write up with nice ending. Article is in Marathi and should be read by everyone who can read it.

Link for the article is here. I am also pasting it here....

रक्ताची नाती
Sunday, March 15th, 2009 AT 4:03 PM

बीप. बीप... बीप. बीप... बीप. बीप... "हा पेजर फेकून द्यायला पाहिजे", असे त्रासिक सूर लावत मी तो आदळत बंद केला. आदल्या दिवशी रात्रीच एक रिलीज संपवून पहाटेच्या साखरझोपेत, नुकत्याच झालेल्या साखरपुड्याच्या आठवणीत पहुडलो होतो. परत डोळा लागतो न लागतो तोच फोनची घंटा खणाणली. आधी पेजर आता फोन. नक्कीच आमचा रिलीज मॅनेजर असणार या खात्रीने वैतागून डोळे चोळत मी फोन उचलला. "Who is it? " मी खेकसलो.

"अरे सुदू, हं ऐकू येतंय का? मी दादा बोलतोय"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, "तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. " भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना? "बोल दादा", मी थोड धैर्य गोळा केलं.

"आधी खाली बैस आणि नीट ऐक. मी अहमदाबादहून बोलतो आहे. बाबांना एक जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. डोक्याला खूप मार बसलाय. ते सध्या कोमात आहेत. आई-मी पुण्याहून आणि वैभवी-दादा (माझी होणारी बायको आणि मेहुणा) मुंबईहून अहमदाबादला पोहोचलो आहोत. पण तू काळजी करू नकोस. आय. सी. यू. मध्ये डॉक्टर नीट काळजी घेत आहेत. पिल्लू (बहीण) परीक्षेच्या तयारीत पुण्यात आहे. तिच्या सोबतीला तनुजा (दादाची होणारी बायको) घरी आहे. " एका दमात त्याने मन हलकं केलं. तोवर माझं धैर्य पूर्णपणे कोलमडलं होतं. कसाबसा हुंदका आवरत मी विचारलं "आणि आईऽ कशी आहे? " ती जरा मनाने हळवी आणि तिचा बाबांवर प्रचंड जीव. "घे तिच्याशीच बोल." त्या दिवशी आईला प्रथमच एवढं हिमतीने बोलताना ऐकलं. तिच्या आत्मविश्वासातला फरक लक्षात येण्याजोगा होता.
वैभवीशी एका गंभीर विषयावर बोलायचा हा माझा पहिलाच प्रसंग. या पूर्वी 'गुजगोष्टी' करणं किंवा नवीन फियान्से या नात्याने इंप्रेशन मारण्याचाच अनुभव होता. तिने तिच्या निपुण डॉक्टरी आवाजात "बाबा नक्की बरे होतील" असा दिलासा दिला आणि मी कसाबसा सावरलो.
आईवडिलांपासून दूर राहणार्‍या प्रत्येकाचं "Worst Nightmare" माझ्यासमोर खर्‍या आयुष्यात उभं राहिलं होतं. तो पहाटेचा फोन वाजला आणि सगळं काही बदललं होतं.

आठवणींचा पूर
डोळ्यांसमोर सतत हाय-डेफिनिशन मध्ये आठवणींचा सिनेमा चालू झाला होता. मन अचानक वीस वर्षं मागे गेलं. लँब्रेटावर सगळा कुटुंब-कबिला घेऊन निघालेले बाबा माझ्या डोळ्यासमोर आले. समोर हॅंडल धरून दादा, मागे पदर-साडी सावरत, लहान बहिणीला आवरत बसलेली आई, आणि सगळ्यात मागे स्टेपनीवर मागल्या सीटला कवटाळून, कसरती करत मी! हे सगळं अवडंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे "आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे? ". आज तेच बाबा अहमदाबाद सारख्या अनोळखी गावी, आयसीयूमध्ये आयुष्याशी झगडत पडले होते, आणि मी ५००० मैल दूर राहून काळजीशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतो. स्टेटबॅंकेतल्या नोकरीच्या कामाने अहमदाबादला गेलेले असताना त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली होती. डोक्याला बसलेल्या मारामुळे 'स्कल फ्रॅक्चर' होऊन खूप रक्तस्राव झाला होता. मेंदूला सूज येऊन एक बाजू पॅरलाइझ झाली होती तर दुसरी बाजू अनियंत्रितपणे सारखी हलत होती. नशिबाने सारख्या परदेशवार्‍या करणारा दादा तेव्हा मदतीला भारतातच होता.
विचारांच्या कल्लोळाने आता माझा मेंदू बधिर होऊ लागला होता. Helplessness was killing me. बर्‍या-वाईट विचारांचं डोक्यात थैमान चालू होतं. पिंजर्‍यातल्या वाघासारख्या येरझारा घालण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं.
महिन्यापूर्वीच बॅंकेतल्या कामाकरता बाहेरगावी असलेले बाबा, आमच्या साखरपुड्याकरता मोठ्ठी सुट्टी काढून आले होते. त्यांच्या आनंदाच्या भरात ते पोस्टिंगला असलेल्या कोणत्याशा गावाहून तीन लग्नांना पुरेल एवढं सामान घरी घेऊन आले होते. साखरपुडा उरकल्यावर ते पोस्टिंगच्या ठिकाणी निघाले तेव्हा मी ऐटीत वैभवीला रेल्वेस्टेशनवर त्यांना सी-ऑफ करायला घेऊन गेलो होतो. सामान चढवून माझी वैभवीला सिनेमाला घेऊन जायची घाई चालली होती. माझा उतावीळपणा त्यांनी नेमका हेरला. "तुम्ही निघा आता. गाडी सुटायला अजून वेळ आहे. मी बसतो काही वाचत. " वैभवीने मला चिमटा काढत शांत केलं. बहुदा तिला म्हणायचं होतं "अरे मुला, तू वडिलांना हमाल म्हणून सामान लोड करून द्यायला आलाहेस का सी-ऑफ करायला? " पण शेवटी माझ्या पोरकटपणाला प्रोत्साहन देत त्यांनी आम्हाला बोगी बाहेर काढलं. शेवटी गाडी सुटली... एकदाची... आणि मी उड्या मारत सिनेमाला जायला काढता पाय घेतला.
आपल्या माणसाचं मोल ते दिसेनासे होईपर्यंत का कळू नये हे मला अजून कळलं नाहीये. मला वाटतं आपला सर्वसामान्य व्यवहारीपणा 'आपल्या' लोकांनाही लावायला हरकत नाही. जसं आपण नाही का, दुकानातल्या सुपर-सेल वर तुटून पडतो... "एंजॉय व्हाईल सप्लाईज लास्ट!"... तेच लॉजिक. फरक फक्त एवढाच की हे सप्लाईज संपले तर हजारपट जास्त मोल देऊनही परत मिळत नाहीत.

यू. एस. ए. ते आय. सी. यू.
मी रोज अपडेट घेत होतो. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस होत होता. मी स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा विफल प्रयत्न करत होतो. अहमदाबादला आता बाबांच्या मदतीला दोन्ही 'होणार्‍या डॉक्टर सुना' 'लोक काय म्हणतील?' ह्याची पर्वा न करता धावून गेल्या होत्या. माझ्या आणि दादाच्या सासुरवाड्यांनी लग्नाअगोदरच सासरेबुवांची काळजी घ्यायला त्यांची 'पाठवण' केली होती... ते पण एका नवीन गावी, केवळ जाणिवेने... विश्वासावर. माणुसकीने पारंपरिकतेवर विजय मिळवला होता.
मी आतुरतेने वाट पाहत असलेली गुड न्यूज काही येत नव्हती. शेवटी मी मनिषाताईला फोन केला. ती
पुण्यातली आमची शेजारीण. एक नामांकित डॉक्टर, नुकतीच बदलून अमेरिकेत आलेली. तिला तपशील देत अखेरीस मी विचारलं... "ताई... मी जाऊ? ". "किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन? ".. "चार".. "लग्गेच निघ". मग माझी चक्रं हलली. दोन दिवसा आधीच घेतलेली कामाची जबाबदारी 'हॅंडोव्हर' करत मी निघालो. It was a leave without pay, but worth every penny lost.
माझ्या सासूबाई, मुंबई एअरपोर्टला होणार्‍या जावयाला धीर आणि अहमदाबादचं तिकीट द्यायला स्वतः आवर्जून आल्या होत्या. एका आईच्या मायेने सांत्वन करत त्यांनी मला आधार दिला. अहमदाबाद एअरपोर्टला घ्यायला दादा आला होता. मला सावरून घेताना तो चेहर्‍यावरची काळजी लपवायचा असफल प्रयत्न करत होता. शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही समजायला लागल्यापासून एकमेकांपासून दूर राहिलेलो असल्याने आम्हां भावांतली भावनिक संभाषणाची ही पहिलीच वेळ, केवळ फॅक्चुअल तपशिलांवरच संपली.
आय. सी. यू. च्या बाहेरच आमची पलटण भेटली... आई आणि सोबत तिच्या होणार्‍या सुना. माझं बाहेरच इतकं ब्रेन-वॉशिंग झालं की मी आत नेमकं काय पाहणार आहे याचीच मला धडकी भरली. वैभवीच्या पाठोपाठ मी एक-एक बेड आणि पडदा ओलांडून जात होतो आणि अनेक कुटुंबांची अगतिक स्थिती पाहत होतो. कोणी ८० टक्के भाजलेलं, कोणी हार्टअटॅकमधून सावरणारं, कोणी ऍक्सिडंट होऊन लोळागोळा झालेलं, एका पडद्याआड ताटातुटीमुळे एका पत्नीने फोडलेला हंबरडा... मन पिळवटून टाकणारं ते भयाण वातावरण होतं. एव्हाना मला भोवळ आली. कसाबसा तोल सावरत मी बाबांपर्यंत पोहोचलो तर धक्काच बसला... तो औषधांचा उग्र वास, सलाईन, रक्ताच्या पिशव्या, जीव असल्याची ग्वाही देणारं ईसीजीचं ते निर्जीव यंत्र, अनेक ट्युबांचं जाळ, टेबलावर बाटल्यांचा खच, तोंडावर सुतकी भाव ठेवून कामात मग्न नर्स आणि बाबांचा अनियंत्रित हलणारा एकच हात... फोनवर मला धीर देताना हे सगळं बरचं सौम्य करून सांगण्यात आलं होतं. मला सावरायला दोन दिवस लागले.

"पप्पाजी"
बाबांच्या अपघाताचा सविस्तर तपशील लवकरच मिळाला. त्यांना जीवनदान देणार्‍या देवमाणसांच्या भाषेत सांगायचं झालं तर.... "मै (मेहुलकुमारजी), अंबालालजी, विमलजी, राजेशकुमारजी और बिरजूभाई, अमावसके दिन मंदिर जा रहे थे, मारुती वॅन मे। रास्तेमें भीड देखी तो समझा ऍक्सिडंट हो गया है। पप्पा का बहोत खून बह रहा था। बेहोश थे। कोई हाथ लगाने को तैयार नहीं था। हमने सोचा भगवान ने हमें मंदिर के बजाय यहां उन्हे बचाने के लिये भेजा है। खून को हाथ से रोक कर हमने पप्पा को उठा के वॅन मे डाला और ले गये गव्हर्न्मेंट हॉस्पिटल। कंपाउंडर बोला एफ.आय.आर के सिवा हात नहीं लगा सकते तो बिरजूभाईने उसके कान के नीचे एक थप्पड लगाई। डॉक्टरसे, नेता का नाम लेके ऍडमिट करवाया। सर पे दबाया हुआ हाथ निकाला तो खून की पिचकारीसे बगलवाली वॉल रंग गई। बाद में पप्पाजी के पॉकेटसे बँक का कार्ड मिला और किसीने मम्मीजी को फोन लगाया।"...

या चाळीशी-पन्नाशीच्या सर्वसामान्य दिसणार्‍या गुजराथी बांधवांनी असामान्य काम केलं होतं. त्या गडबडीत त्यांचा हरवलेला मोबाईल, रक्ताने माखलेली गाडी... ह्याची त्यांना पर्वा नव्हती. आम्ही त्यांना हरवलेल्या मोबाईलचे पैसे, येनकेनप्रकारेण देण्याचा प्रयत्न केला. पण हे असामान्य लोक आम्हां सामान्यांची पैशाची भाषा बोलायला तयारच नव्हते.

त्यांना हवी असलेली गोष्ट पैशाने विकत घेण्याजोगी नव्हती.... "हमे तो बस्स, पप्पाजी को उन के पैरों पे हम निकले थे वो मंदिर ले जाना है... तो हम को सब कुछ मिल जायेगा।"

त्यांनी आमच्या आईला "मम्मीजी" तर बाबांना "पप्पाजी" ही पदवी प्रेमाने बहाल केली होती!

मदतीचे हात
आमचं नवीन कुटुंब आता हॉस्पिटलच्या एका खोलीत वसलं होतं. ६x६ ची खोली, एक खिडकी, एक दार, एक बेसीन, एक फॅन... बस्स. त्यात आम्ही किमान सात लोक - आई, तीन मुलं, दोन होणार्‍या सुना, दूरवरून प्रवास करून येणारे नातलग आणि गोडबोलेकाका. ते मूळचे मराठी, पण अहमदाबादला स्थायिक झालेले. त्यांच्या मराठीला एक गोड गुजराथी हेल होता. आमचा त्यांच्याशी आधीचा काहीच परिचय नव्हता. ते बाबांच्या बँकेत नोकरीला होते. तिथूनच त्यांची बाबांशी थोडीफार ओळख झालेली. आपल्या गावी, आपला एक सहकर्मचारी मृत्यूशी झगडतो आहे आणि त्याचं कुटुंब नवीन गावी एकटं पडलंय ह्याच कल्पनेनं त्यांना 'व्यापलं' होतं. आम्ही आळीपाळीने २४ तास बाबांसोबत असायचो. ड्यूटीवरील डॉक्टर आणि नर्स नीट काळजी घेत आहेत ह्याची खात्री करायला, बेडसोअर्स होत नाहीयेत आणि ते खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायला. दिवसभर बँकेतलं काम संपवून गोडबोलेकाका रात्री आठाच्या ठोक्याला हजर असायचे, फ्रेश! अधूनमधून सोबत आईला आधार द्यायला काकूही असत. "अहो, तुम्हा सगळ्यांना दिवसभर आहेच की... मला काय बँकेतच जायचं आहे." असा ते विनोद करत. "मी जागतो सकाळी २ ते ६. तुम्ही जरा झोप काढा", असं म्हणत सगळ्यात कठीण वेळ ते मागून घ्यायचे.

याआधी मला कॉलेजात सबमिशन्सच्या आदल्या रात्री नाईटस मारायचा अनुभव होता, पण ही जबाबदारी फारच मोठी होती. काही रात्री बाबांच्या उशाशी जागल्यानंतर, मी अनेक रात्री झोपेतून ओरडत भेदरून उठायचो. कायम एकच स्वप्न... ऑन माय वॉच, मला नकळत डोळा लागलाय आणि त्यात बाबा पलंगावरून खाली पडलेत आणि मी काहीच करू शकत नाहीये. मेंटल ट्रॉमा झालेल्या लोकांना असली नाईटमेअर्स पडतात म्हणे. युद्धातून परत येणार्‍या सैनिकांना किती मानसिक तणावातून जावं लागत असेल, नाही? त्यांचे अनुभव तर अजून कितीतरी जोखमीचे आणि भयावह असतील.

आत्या, काका, मामा, त्यांची मुलं, सुना, फॅमिली फ्रेंडस... सगळे कामातून वेळ काढत भेटीला, मदतीला, आधाराला येऊन जायचे. त्यांनी नवस बोलले, उपास केले, पारायणं केली, अंगारा पाठवला. प्रत्येक जण आपापल्यापरीने जमेल तशी मदत करत होता.

अहमदाबादच्या मराठी व अमराठी लोकांनी सर्वतोपरी मदत केली. रोज सकाळी चहा आणि आंघोळीचं गरम पाणी तयार असायचं. रात्री दादाचा मित्र आईसाठी पथ्याचं जेवण घेऊन यायचा.

बाबांच्यात आता मराठी, गुजराथी, पंजाबी आणि बंगाली रक्त वाहत होतं. प्रथम, काही भेटीस येणार्‍या नातेवाईकांनी रक्त दिलं. अनेकांचे ब्लडग्रूप मॅच व्हायचे नाहीतं. अजून रक्ताची गरज पडली तेव्हा मेव्हण्याने त्याच्या ऑफिसच्या अहमदाबाद शाखेत आवाहन केले. आवाहनानंतर तासाभरात अनेकांनी बाह्या वर करत, काहीही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, आनंदाने रक्त दिलं. आपण एक जीव वाचवतो आहे ह्याच भावनेने ते उत्साही दिसत होते.

ह्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही सगळे नवीन गावी तग धरून होतो आणि रोज उगवत्या सूर्याबरोबर परत mission "increasingly" impossible च्या मागे लागायचो.

दोन इंची ब्रेक-थ्रू
आता बाबांना कोमात जाऊन एक महिना उलटून गेला होता. आलेली दिवाळी फुसक्याबारसारखी अपेक्षा उंचावून निघून गेली. कोमा, इन्फेक्शन, तापाशी लढताना अनेक औषधं झाली, सीटी स्कॅन झाले, अंगारे, पोथ्या, पारयणं, नवस झाले. प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रयत्न केले. पण यश मात्र हाती लागत नव्हतं. एवढे उपाय करूनसुद्धा रिकवरी दिसत नव्हती आणि टेन्शन वाढत होतं. माझं मन आता वैभवीच्या "बाबा नक्की बरे होणार" या मंत्रावर शंका घ्यायला लागलं होतं. "हे बघ, स्टॅटिस्टिकली, कोमात पाच दिवसांनंतर वाचणार्‍यांचं प्रमाण..." माझं गणिती वाक्य अर्धवट तोडत ती म्हणायची "ते काहीही असो. मला खात्री आहे बाबा नक्कीच, शंभर टक्के शुद्धीवर येणार. " शेवटी एंडोस्कोपी स्पेशालिस्ट कडे गेलो असताना 'युरेका' क्षण आला. तोंडातली फीडिंग ट्यूब २ इंचांनी भलत्याच ठिकाणी औषधं पोहोचवत होती. दोन इंची ट्यूबचं महत्त्व त्या दिवशी कळालं. आमच्या आशा परत पुलकित झाल्या. प्रयत्न नव्या जोमाने सुरू झाले.

एके दिवशी आईच्या नकळत, तिला बाबांच्या उशाशी बसून त्यांचा हात हातात घेत हळुवारपणे कोमातून बाहेर बोलावतांना पाहिलं. बाबा आपलं बोलणं ऐकत आहेत असा तिचा विश्वास होता. याआधी माझ्या नवतरुण खुळचट फिरंगी विचारांच्या भरात मी त्यांना चिडवायचो "अरे काय तुम्ही... फक्त ऑफिस, घरकाम, मुलं... हेच का तुमचं आयुष्य? जरा हातात हात घेऊन पिक्चरला का जात नाहीत? एवढं काय ते लाजायचं." आईपण कमाल करायची. पूजा समारंभाला बाबांसोबत "मम आत्मनः" करत, पळीने उदक सोडताना नव्या नवरीसारखी लाजायची. नंतर मला उपदेशाचे पाठ मिळायचे... "अरे प्रेम असायला हातात हात घालून, नट-नट्यांसारखं गावभर गाणी म्हणत हिंडावं लागत नाही". तो उपदेश माझ्या 'मॉडर्न' डोक्याच्या आरपार निघून जायचा. आईचं ते हळुवार बोलावणं ऐकून असं वाटायचं की अचानक बाबांच्या हातांना परत संवेदना यावी आणि आईच्या हातांना त्यांनी अलगद धरून घ्यावं.

ट्यूब योग्य जागी बसल्यानंतर, आधी निरुपयोगी ठरणारी औषधं आता आपली किमया दाखवू लागली होती. चार पाच दिवसांनी हाताचं ते अनियंत्रित हलणं बंद झालं. हळूहळू त्यांच्यात संवेदना येऊ लागली, डोळ्यांच्या पापण्या हलायला लागल्या, ओठ थरथरायला लागले. अखेरीस एक दिवस बाबा त्यांच्या आवडीचं स्तोत्र, विष्णुसहस्रनाम पुटपुटत हळूहळू कोमातून बाहेर आले. त्यांची आतल्याआत चाललेली स्ट्रगल तेव्हा दिसली. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाहेरच्या नुकत्याच संपलेल्या दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज आमच्या मनात परत जागे झाले.

त्या नंतर आमची रोज ओळखपरेड चाले. बाबांच्या नशिबाने त्यांना बायकोचं नाव नीट आठवलं! मुलांची नावं एकदम आठवली नाहीत मात्र त्यांनी एकेका वाक्यात तीनही मुलांची व्यक्तिचित्रं त्यांच्या मिष्किल शैलीतून इतकी बेमिसाल मांडली की आम्ही सर्वांनी तोंडात बोटं घातली. बाबांच्या स्मृतीत आम्ही पोरं नावांनी नाही तर आमच्या 'करतुतीं'नी घर करून होतो!

ते हळूहळू चालायला फिरायला लागले आणि घरी जायची परवानगी मिळाली तोवर अहमदाबादेतल्या आमच्या वास्तव्याचा दीड महिना उलटून गेला होता. त्यांना पूर्णपणे पूर्ववत व्हायला एका वर्षाहून जास्त वेळ लागला.

अहमदाबादहून निघायच्या आदल्या दिवशी बाबांना वाचवणारे गुजराथी बांधव आवर्जून वॅन घेऊन आले होते, त्यांच्या पप्पाजींना आणि आम्हां सगळ्यांना त्यांच्या श्रद्धेच्या मंदिरात व आपल्या घरी जेवायला घेऊन जायला. त्या दिवशीच्या खाकर्‍याची आणि उंधियोची चव काही औरच होती.

देव + माणसं = देवमाणसं !!
माझा चमत्कारांवर, अंधश्रद्धांवर विश्वास नाही. माझ्यामते बाबांचा सर्वपित्री अमावस्येला झालेला अपघात हा केवळ को-इन्सिडन्स होता. कदाचित त्या रात्री जरा जास्त अंधार असावा. पण 'देव' ह्या संकल्पनेने आम्हां सगळ्यांना आशा दिली हे मात्र खरं. हतबल क्षणी, मनुष्याच्या ताकदीच्या बाहेरही अनेक गोष्टी आहेत ह्याची जाणीव होते. "आसमान में रहनेवाला जादूगर" काही किमया करून जाईल ह्या पुसटशा आशेवर आम्हाला संकटातल्या दिवसांना सामोर जाण्याचं बळ मिळालं.

आभार मानायचे ते कोणाकोणाचे? रस्त्यावर निपचित पडलेल्या अपरिचित व्यक्तीला मदतीचा हात देणार्‍या जीवनदात्यांचे? की बाबांच्या रिकवरी फेज मध्ये त्यांचा आत्मविश्वास परत द्यायला एक बिनकामी पोस्ट तयार करणार्‍या स्टेटबँकेतल्या स्नेह्यांचे? की सामजिक भोचकपणा झुगारून देत, फुलटाईम घरचे डॉक्टर्स देणार्‍या आमच्या सासुरवाड्यांचे? की दुखाःच्या क्षणी आपापल्यापरीने आधार देणार्‍या सगळ्या आप्तस्वकीयांचे? हे सगळे लोक तर आभारप्रदर्शनाच्या फॉर्म्यालिटी पलिकडे गेलेले आहेत. माणुसकीने आपलंसं करणारे हे लोक भेटल्यावर माझा देवावरचा विश्वास वाढला नसला तरी देवमाणसांवरचा विश्वास नक्कीच दृढ झाला आहे.

बायकांच्या भावनिकतेवर पुरुषदृष्टीने कितीही विनोद केले तरी, रात्री रडणार्‍या बाळाचा आवाज ऐकून फुटणारा पान्हा आणि आयुष्याशी झगडत असलेल्या नवर्‍याची काळजी घेणारी बायको बघितल्याशिवाय त्या भावनिकतेची आणि संवेदनक्षमतेची खरी किंमत कळत नाही.

देश, वेष, भाषा, जात ह्यांच्यापलीकडे गेलेली माणुसकी पाहिली की माणसाचं खरं 'नेचर' कळतं. भावनेच्या आधारावर, संवेदनक्षम मनं मोकळी करत जाणारी ही चालती बोलती देवमाणसं भेटली की त्यांच्या पावलावर आपली छोटी पावलं टाकण्याची प्रेरणा मिळते.

जीवनदान देणारी उदात्त मनुष्यवृत्ती पाहिल्यावर, जेव्हा जीव घ्यायला निघालेले, लोकांना एकमेकांपासून दूर करणारे, संकुचित वृत्तीचे मराठी-बिहारी, रशियन-जॉर्जियन, हिंदू-मुस्लिम जातीयवाद ऐकले की वाटतं, "वि कॅन डू बेटर दॅन धिस". बाबांच्या एका जुन्या वहीत लिहिलेला शेर आठवतो - "अष्कों को जो शबनम समझे, दर्दों को जो सरगम समझे, इन्सां है वो इन्सां बडा, जो दुश्मन को भी हमदम समझे|"

रक्ताची नाती
कधीकधी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, उंधियो खाताना घास घशात रेंगाळतो, डोळे पाणावतात आणि आमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी १९९९ची ती अहमदाबादमधली दिवाळी आठवते. आम्ही सगळे त्या अनुभवातून खूप शिकलो. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला, मनाला जाणवलेला फक्त चार महिन्यांचा आढावा. बाकी लोकांचे अनुभव बरेच वेगळेही असतील. पण ते मी इथे सांगणं योग्य ठरणार नाही.

झाडांमधून जंगल पाहायचं असेल तर जरा दूर जावं लागतं असं म्हणतात. आज या गोष्टीला बरीच वर्षं झाली आहेत. आता दुरून माणुसकीचं जंगल कसं स्वच्छ दिसतंय!

आम्हां दोघा भावांची लग्नं ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांतच धूमधडाक्यात साजरी झाली. सासरकडच्या मंडळींनी जय्यत तयारी केली होती. अंगावर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथस्कोप घालून अहमदाबादमध्ये डॉक्टरच्या रुबाबात वावरणार्‍या सुना, आता नऊवारीत आणि दागिन्यात लाजल्या सवरल्या होत्या. त्यांच्या सौंदर्यावर सजलेला तो आत्मविश्वासाचा, अमाप जिव्हाळयाचा, आणि माणुसकीचा अदृश्य दागिना त्यांचं रूप अजूनच खुलवत होता. लग्नाला सगळ्या नातेवाईकांत, शुभचिंतकांत अहमदाबादच्या खास नातलगांचा पण समावेश होता. अंबालालजी, मेहुलकुमारजी, विमलजी, राजेशकुमारजी, बिरजूभाई आणि गोडबोलेकाका आवर्जून आले होते.

आमच्या रक्ताच्या नात्यांत आता अनेकांची भर पडली होती. 'बहनेवाला खून' थांबवणारी, पिशव्या भरभरून रक्त देणारी, आणी एका तान्हुल्यागत काळजी घेत बाबांना नवजीवन देणारी... "रक्ताची नाती".

-सुदर्शन महाबळ